वसई-विरारकरांचा 'विरार-चर्चगेट' जीवघेणा प्रवास; दीड वर्षात २८४ मृत्यू, २८८ जखमी

वसई, ११ जून: मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या वसई-विरार भागातील नागरिकांसाठी लोकल प्रवास हा जीवावर बेतणारा ठरू लागला आहे. मागील दीड वर्षात (जून २०२४ ते ९ जून २०२५) मिरा रोड ते वैतरणा दरम्यान तब्बल २८४ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून, २८८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रेल्वे पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यातील १७१ मृत्यू लोकलच्या धडकेत, ६१ मृत्यू धावत्या लोकलमधून पडून, तर ५२ मृत्यू इतर कारणांनी झाले आहेत. तसेच, १८० जखमी हे लोकलमधून पडल्यामुळे झालेत.
गर्दी जीवघेणी ठरत आहे
विरार, नालासोपारा, वसई, नायगाव येथून दररोज सुमारे १२ ते १५ लाख प्रवासी चर्चगेटच्या दिशेने प्रवास करतात. विरार ते चर्चगेट दरम्यान दररोज २२४ साध्या लोकल आणि ५७ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मात्र, वाढत्या गर्दीमुळे डब्यात उभं राहण्यासही जागा नसते, त्यामुळे अनेक प्रवासी दरवाज्यावर लटकून प्रवास करत आहेत.
महिलांची चिंता व्यक्त
महिला प्रवासी मृदुला खेडेकर म्हणाल्या, “प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन वेळापत्रक महिनाभर आधीच नियोजित करायला हवे. फक्त रेल्वे विभाग नव्हे, तर राज्य शासन आणि महापालिका यंत्रणांनाही यात लक्ष घालावे लागेल.”
What's Your Reaction?






