जिल्हा परिषद शाळा मार्गात भंगार वाहने-टपऱ्यांचा अडथळा! महापालिका आयुक्तांकडे मुख्याध्यापकांची आर्जव

जिल्हा परिषद शाळा मार्गात भंगार वाहने-टपऱ्यांचा अडथळा! महापालिका आयुक्तांकडे मुख्याध्यापकांची आर्जव

विरार : मनवेलपाडा पूर्व येथील जिल्हा परिषद शाळेजवळील भंगार-पडिक वाहने व टपऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गात अडथळा ठरत असल्याने तात्काळ हटविण्यात याव्यात, अशी आर्जव शाळा मुख्याध्यापकांनी वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे. मात्र वसई-विरार महापालिकेने अद्याप हा अडथळा हटविण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका संभवत असल्याने शिक्षक व पालकवर्ग काळजीत आहे.

वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘ब`अंतर्गत विरार-मनवेलपाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत 3 ते 14 वयोगटातील सुमारे एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. खेरीज; या शाळा परिसरात अंगणवाडी व महापालिकामार्फत लसीकरण केंद्रही चालवले जात आहे. या शाळेत प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. मात्र शाळेच्या संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराजवळ पडिक टपऱ्या, दगड-रॅबिट व पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या दुचाकी-चारचाकी गाड्या भंगारावस्थेत मोठ्या प्रमाणात जमा करून ठेवण्यात आलेल्या आहेत. या वस्तू शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने त्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांनी केली आहे. 

दरम्यान; जिल्हा परिषद शाळा परिसर ना-फेरिवाला क्षेत्र घोषित करून तसा फलक या ठिकाणी लावण्यात यावा व योग्य उपाययोजना करून संरक्षित करण्यात यावा, अशी विनंतीही पालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

वसई-विरार महापालिकेची भंगार वाहनविरोधी मोहीम थंडावली

विशेष म्हणजेे; रस्त्याकडेला उभ्या असलेल्या भंगार वाहनांविरोधात मे 2022 मध्ये वसई-विरार महापालिकेने मोहीम उघडली होती. ही वाहने ताब्यात घेण्याबाबत पालिकेने वाहनधारकांना नोटीस बजावली होती. अन्यथा, प्रतिदिन दोनशे रुपये इतका दंड ठोठावण्याचा इशारा पालिकेने दिला होता. प्रभागनिहाय ही कारवाई करण्यात येणार होती. मात्र सद्यस्थितीत पालिकेची ही मोहीम थंड पडली आहे. पालिकेची ही मोहीम थंडावण्यामागे जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी पालिकेकडेच जागा नसल्याची माहिती पुढे आली आहे.

 

पोलिसांच्या जप्त वाहनांमुळे सुरक्षितता धोक्यात!

विरार मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेला लागूनच पोलीस चौकी आहे. या चौकीजवळ अनेक गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेली वाहने उभी करून ठेवण्यात आलेली आहेत. या वाहनांची पोलिसांमार्फत विल्हेवाट किंवा त्यांची निगा राखणे अपेक्षित आहे. मात्र पोलिसांच्या निष्काळजीमुळे अनेक वाहने भंगारावस्थेत गेलेली आहेत. या भंगार वाहनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात या वाहनांना खेटूनच अनेक फेरीवाले आपल्या टपऱ्या लावत असल्याने विद्यार्थ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झालेला आहे. शिवाय या 90 फुटी रस्त्यावर अनेक फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले असल्यामुळे पादचारी व वाहनधारकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही भंगार वाहने शाळेच्या संरक्षक भिंतीला खेटून असल्याने दुदैवाने या भंगार वाहनांना आग वगैरे लागल्यास शेकडो मुलांचा जीव धोक्यात येणार असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी वसई-पेल्हार पोलीस चौकीजवळील भंगार वाहनांनी अचानक पेट घेतला होता. त्यात मोठी आर्थिक हानी झालेली होती.

या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रभारी आयुक्त रमेश मनाळे व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासोबत मोबाईल संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. तर प्रभाग समिती ‘ब`चे प्रभारी सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान; विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांचाही मोबाईल बंद होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow