दु:खातून सावरत गाला कुटुंबियाचा निर्णय विरार मधील महिलेचे देहदान, नेत्रदान यशस्वी

वसई- पत्नीचे अकाली निधन झाल्याचे दु:ख पचवून विरारच्या किशोर गाला यांनी पत्नीचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांनी या निर्णयाला संमती दिल्यानंतर गाला यांच्या पत्नी मनिषा यांचे देहदान, नेत्रदान आणि त्वचादान यशस्वीपणे पार पडले.
विरार पश्चिमेच्या विवा महाविद्यालयाच्या परिसरात राहणाऱ्या गाला कुटुंबिय राहतात. किशोर गाला यांच्या पत्नी मनीषा गाला (४९) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गाला यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या धक्क्यातून सावरत मनीषा यांचे पती किशोर यांनी त्वरित देहदानाचा निर्णय घेतला. देहदानची प्रक्रियेसाठी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर लगेचच निर्णयानंतर नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान करण्यात आले. मुंबईच्या नायर रुग्णायात लक्ष्मण धुरी, डॉ. स्नेहा आणि डॉ. युवराज भोसले यांच्या सहकार्याने देहदानाची संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली. तर नेत्रदान नालासोपाऱ्याच्या रिद्धिविनायक रुग्णालयात करण्यात आले. देहमुक्ती मिशन वसईचे कार्यकर्ता सागर वाघ यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रुग्णालयाच्या डॉ. निकम, डॉ अवधेश आणि त्यांच्या टीमने नेत्र स्वीकारून ते कॉर्निया सहीयारा आय बँक, ठाणे येथे सुरक्षित पोहोचविले आहेत. या नेत्रदानामुळे येत्या ३६ तासात किमान दोन नेत्रहीनांना दृष्टीचा लाभ होणार आहे. तसेच त्वचादान प्रक्रिया नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली येथे वैष्णवी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.
‘गाला परिवाराचा हा निर्णय समाजासाठी नवा विचार देणारा तर आहेच परंतु 'मृत्यूनंतरही आपण अनेकांना नवे जीवन देऊ शकतो' हा सेवाभावी विचार समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, असे द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे संस्थापक पुरूषोत्तम पवार यांनी सांगितले.
What's Your Reaction?






