विरार:वसई विरार शहरात रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन जल्लोषात पार पडले. यावेळी शहरात वसई विरार शहर महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. एकूण १४ हजार १८३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, त्यापैकी ८ हजार २८२ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले, हे प्रमाण ५८.३९ टक्के एवढे होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमधील विसर्जनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. महापालिकेतर्फे चोख व्यवस्था केल्यामुळे विसर्जनादरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही, गणेशभक्तांची कुठलीही गैरसोय झाली नाही.

रविवारी शहरातील दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाकरिता, प्रत्येक कृत्रिम तलाव विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप, फिरते शौचालय उभारून दिवाबत्तींची सोय करण्यात आली होती. तसेच पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक गणेशभक्तांच्या मदतीसाठी तैनात होते. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी वर्ग आपापल्या प्रभागातील विसर्जन स्थळावर हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते.

तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा देखील पालिकेने ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव उभारले होते. एकूण विसर्जनापैकी कृत्रिम तलावात ८ हजार २६२ घरगुती गणेशमूर्तींचे तर २० सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन झाले. उर्वरित ५ हजार ९०१ मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक तलाव आणि समुद्रात झाले. तसेच यंदा विसर्जनात शाडू मातीच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामुळे नैसर्गिक तलावांचे प्रदूषण झाले नाही. कृत्रिम तलावांच्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनाच्या संख्येत वाढ झाली आहे. येणाऱ्या पाच दिवसीय, सात दिवसीय, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी आदी विसर्जनावेळी नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे आणि निसर्गाची हानी टाळावी असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.

वसई विरार शहरात जागोजागी कृत्रिम तलाव उभारल्यामुळे तसेच विसर्जनस्थळी सर्व सोयी-सुविधा उलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना घराजवळ, निर्विघ्नपणे विसर्जन करता आले, यासाठी अनेक नागरिकांनी, गणेशभक्तांनी महापालिकेचे आभार मानले.

बंद दगडखाणीच्या पाण्यातील विसर्जन 
सोमवारी पहाटे चारपर्यंत दगडखाणीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले. यंदा दगडखाणीतील विसर्जनासाठी कन्व्हेअर बेल्टची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली होती. कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने विसर्जन करणे अधिक सोयीस्कर ठरले, वेळेची बचत झाली आणि कमी मनुष्यबळात विसर्जन पार पडले, असे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त समीर भूमकर, सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी समक्ष उपस्थित राहून विसर्जनाचा आढावा घेत, संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडली. 

दिड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २०२४     
        
कृत्रिम तलाव 
घरगुती - ८ हजार २६२
सार्वजनिक – २०
एकूण – ८ हजार २८२

नैसर्गिक तलाव व जेटी 
घरगुती - ५ हजार ८३१
सार्वजनिक – ७०
एकूण – ५ हजार ९०१