वसई, ४ जून: वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने २८ बोगस डॉक्टर उघडकीस आणले असून, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बोगस डॉक्टरांकडून परवानगीशिवाय आणि कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना सुरू करण्यात आलेले दवाखाने बंद करण्यात आले आहेत. हे तथाकथित डॉक्टर नोंदणी नसलेल्या, बोगस पदव्या वापरणाऱ्या किंवा वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती असून, त्यांनी बेकायदेशीरपणे डॉक्टर म्हणून काम सुरू केले होते.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बोगस डॉक्टरांची संख्या नालासोपारा पूर्व भागात सर्वाधिक असून, तेथे हे केंद्रबिंदू बनू लागले आहेत. याशिवाय विरार, नारंगी, राजावळी, धानिव बाग, बिलापाडा, सातिवली, हवाईपाडा, पेल्हार वनोठापाडा, बावशेतपाडा, वाकणपाडा, चिंचोटी, वालीव, संतोष भवन, अकापुरी, मनीचा पाडा, रिचर्ड कंपाउंड आणि नवघर पूर्व या भागांमध्येही बोगस डॉक्टर आढळून आले आहेत.

या डॉक्टरांनी दाटीवाटीच्या परिसरात, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अनधिकृत बांधकामांमध्ये आपले दवाखाने थाटले होते. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा महापालिकेच्या परवानगीशिवाय हे व्यवसाय सुरू करण्यात आले होते. काही ठिकाणी वैद्यकीय सहाय्यक, कंपाउंडर किंवा परिचारक देखील स्वत:ला डॉक्टर म्हणून मांडत होते.

“बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून चुकीचे उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून अशा संशयास्पद डॉक्टरांची माहिती तातडीने आरोग्य विभागास द्यावी,” असे आवाहन महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी केले आहे.

वसई-विरार महापालिका बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवत असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात बोगस डॉक्टर असल्यास जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.