वसई-विरार महानगरपालिकेचा पर्यावरण पूरक उपक्रम: मूर्तीकारांना शाडू मातीचे मोफत वाटप

वसई, दि. ४ ऑगस्ट २०२५ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज मूर्तीकारांना मोफत शाडू मातीचे वाटप करण्यात आले.
महानगरपालिकेने यावर्षी पीओपीच्या मूर्ती निर्मितीऐवजी शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचे आवाहन शहरातील मूर्तीकारांना केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत वसई-विरार मूर्तिकार संघटनेमार्फत शाडू माती पुरवठ्याची मागणी करण्यात आली होती.
त्यास अनुसरून आज दिनांक ४ ऑगस्ट रोजी महापालिकेने २५ मूर्तीकारांना प्रत्येकी ४० गोणी प्रमाणे एकूण १००० गोणी शाडू मातीचे वाटप केले. या उपक्रमाच्या वेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. श्री. दीपक सावंत, उपआयुक्त मा. श्री. अजित मुठे, स्थानिक मूर्तिकार, पत्रकार बांधव तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत मूर्तीकारांनी महानगरपालिकेचे आभार मानले. यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त मा. दीपक सावंत यांनी नागरिकांना आवाहन केले की, “शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.”
महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?






