वसई-विरार महापालिकेत २८ चार सदस्यीय प्रभागांची रचना, एक प्रभाग तिघांसाठी आरक्षित

वसई, 13 जून: तब्बल पाच वर्षांनंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने प्रभाग रचनेची प्रक्रिया हाती घेतली आहे. नव्या आदेशानुसार वसई-विरार महापालिकेत ४ सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असून, एकूण २९ प्रभाग तयार केले जातील. यामध्ये २८ प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा असेल.
महानगरपालिकेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली होती. मात्र, कोविड-१९ महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर, पाच वर्षांनंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २०११ च्या लोकसंख्येचे निकष घेतले जात असून, एका प्रभागात सरासरी ३५,००० ते ४०,००० इतकी लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. याआधारे २९ प्रभागांची आखणी करण्यात येणार आहे. ही रचना चार सदस्यीय स्वरूपात असून, त्यात केवळ एक प्रभाग हा तीन सदस्यीय राहणार आहे.
प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी मंगळवारी पालिकेत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेचे काम उपायुक्त दिपक झिंजाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्यावर अंतिम मंजुरी दिली जाईल.
वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली होती. सुरुवातीस एक सदस्यीय प्रभाग व्यवस्था होती, जी २०२१ मध्ये त्रिसदस्यीय करण्यात आली होती. मात्र त्या रचनेअंतर्गत निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. आता प्रथमच ४ सदस्यीय प्रभाग रचना अंमलात येणार असून, त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता आहे.
नव्या रचनेनुसार ११५ सदस्यांची निवड होणार आहे. लवकरच प्रभाग आराखडा तयार करून सार्वजनिक सूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातून मिळाली आहे. राजकीय पक्षांनीही यानुसार आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
What's Your Reaction?






