वसई-विरार महापालिका मुख्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर; बॅग तपासणी यंत्र धूळ खात पडून

विरार, 29 मे – वसई-विरार महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या मुख्यालयात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेली बॅग तपासणी यंत्रणा अद्यापही कार्यान्वित न झाल्याने महापालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य दरवाजावरच बसवण्यात आलेले हे यंत्र सध्या निष्क्रिय अवस्थेत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
विरार पश्चिमेतील यशवंतनगर येथे असलेले हे सात मजली मुख्यालय सुमारे ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारले असून त्यासाठी सुमारे ₹२४५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या इमारतीत आयुक्तांसह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, स्थायी समिती भवन, सभागृह इत्यादींचा समावेश असून दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येथे ये-जा करत असतात.
सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नागरिकांची व त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी महापालिकेने आधुनिक बॅग तपासणी यंत्र बसवले असले तरी, ते अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही यंत्रणा धूळ खात पडून आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. महापालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वी महापालिकेत बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची अफवा पसरली होती, ज्यामुळे काही काळ भयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या वेळी बॉम्ब शोध पथकासह सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच योग्य सुरक्षाव्यवस्था असणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त अनिकुमार पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तपासणी यंत्रणेत अद्याप काही विद्युत कामे प्रलंबित आहेत. ती लवकरच पूर्ण करण्यात येणार असून यंत्रणा कार्यान्वित केली जाईल."
ही यंत्रणा सुरु झाल्यानंतर मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवणे व त्यांच्या बॅगची तपासणी करणे सुलभ होणार आहे, तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही मोठी मदत होणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
What's Your Reaction?






