वसई - रस्त्याच्या कडेला वर्दळीच्या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच गाड्या ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 50 जणांविरोधात पेल्हार, वालीव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सातिवली नाका, रेंज ऑफिस, गोलानी नाका, गोखिवरे, भोयदा पाडा आदी ठिकाणी करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या या कारवाईत 50 जणांविरोधात कलम 285 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यावरील अरुंद रस्ते, त्यावरील फेरिवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. रस्त्याच्या कडेला असणारे खाद्यपदार्थांचे वाढणारे स्टॉल यामुळे रस्त्यावर वर्दळ होते. तसेच स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करण्यात येतो यामुळे गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होतो. याशिवाय आद्योगिक क्षेत्रात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता निर्माण होते. अशा विक्रेत्यांविरोधात तसेच रस्त्यात उभ्या असणाऱ्या वाहनांविरोधात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने कारवाई सुरू केली आहे.