वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ‘खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती कार्यशाळा’ संपन्न
विरार दि. २२ मे २०२५ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज दि. २२ मे २०२५ रोजी “खरेदी व बांधकामे निविदा कार्यपद्धती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन मा.आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विशेषत: मा.अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट महापालिकेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना निविदा कार्यपद्धतीतील बदल, नवीन शासन निर्णय व कायद्यांविषयी मार्गदर्शन करणे होते. यावेळी मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. इंद्रजीत गोरे व मा.उप मुख्य लेखापरीक्षक श्री. मनोज पवार यांनी उपस्थितांना निविदा कार्यपद्धतीवरील विविध शंकांचे निरसन करत, सुस्पष्ट मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यशाळेत पीपीटी सादरीकरणाद्वारे निविदा प्रक्रियेतील नवीनतम धोरणे व त्रुटी दूर करण्यासाठी केलेले उपाय याबद्दल माहिती दिली गेली. कार्यशाळेची प्रमुख थीम होती – निविदा कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणे आणि त्यास सुसंगत बनविणे.
या कार्यशाळेला मा.अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. इंद्रजीत गोरे, उप-आयुक्त श्री. सुभाष जाधव, उप-आयुक्त श्रीमती अर्चना दिवे, मा.उप मुख्य लेखापरीक्षक श्री. मनोज पवार, महानगरपालिकेचे सर्व सहा.आयुक्त, अभियंते, विभाग प्रमुख, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेतील निविदा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली असून, भविष्यात आणखी अशी कार्यशाळा घेतली जाणार असल्याचे सांगितले गेले.
What's Your Reaction?






