वसई-सांडोर येथील जागेत भूमाफियांकडून मातीभराव शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडित

विरार:मागील काही दिवसांपासून विकासक व भूमाफियांकडून होत असलेल्या अनधिकृत माती व डेब्रिज भरावामुळे मोकळ्या जागांचे अस्तित्व धोक्यात असून, काही ठिकाणी पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वसई-सांडोर येथील सर्व्हे क्रमांक 148/6/1, 148/6/2, 148/4, 146/1, 146/2, 147/4, 151/6 या जागेत अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात माती-डेब्रिज भराव करण्यास सुरुवात झालेली असल्याने येथील जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून पर्यावरणालाही धोका निर्माण झालेला आहे. शिवाय गौण खनिज व उत्खननातून रॉयल्टीपोटी शासनाला प्राप्त होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडित गेला आहे. त्यामुळे संबंधित विकासक व भूमाफियांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) वासळई विभागप्रमुख अमोल म्हात्रे यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे केली आहे. या मागणीनंतर सांडोर तलाठी दिनेश पाटील यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. या जागेत विकासक बशीर अहमद खान व अन्य जागा मालकांनी तब्बल 4 हजार 601 ब्रास माती तसेच डेब्रिज भराव केल्याचे तलाठ्यांनी अहवालात नमूद केले आहे. मात्र पुढील कार्यवाही तहसीलदारांकडून करण्यात येईल, अशी माहिती तलाठी दिनेश पाटील यांनी दिली आहे.
मागील काही वर्षांत वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामांची संख्या वाढलेली आहे. या बांधकामांसाठी मातीभराव करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी तहसीलदारांच्या परवानगीने शासनाला आवश्यक परवानगी शुल्क भरावे लागते. मात्र हे शुल्क लाखो रुपयांत असल्याने अनेकदा विकासक विनापरवानगी घेणे टाळतात. अनेकदा तर प्रशासनाच्या नजरेआड मातीभराव केला जातो. मुंबई-अहमदाबाद महामार्गाशेजारील शेकडो एकर जागांत अशा पद्धतीने या आधी माती व डेब्रिज टाकून या जागांवर बांधकामे व अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. हे लोण आता वसई पश्चिमेलाही पसरले असून, शहर आणि परिसरात प्रस्तावित बांधकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकलेले दिसतात. विशेष म्हणजे; शासनाच्या व खासगी पाणथळ जागाही याला अपवाद राहिलेल्या नाहीत. या जागांवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांनी मातीभराव केलेला आहे. या प्रयत्नांत शासनाचा रॉयल्टीपोटीचा लाखो रुपयांचा महसूल बुडवलेला आहे.
वसई-सांडोर येथील सर्व्हे क्रमांक 148/6/1, 148/6/2, 148/4, 146/1, 146/2, 147/4, 151/6 या जागेत अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात माती-डेब्रिज भराव करण्यास सुरुवात झालेली असल्याने मोठ्या प्रमाणावरील जमीन क्षेत्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे संबंधित विकासक व भूमाफियांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) वासळई विभागप्रमुख अमोल म्हात्रे यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे केली आहे.
या मागणीनंतर सांडोर तलाठी दिनेश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गौण खनिज उत्खनन व वाहतूक व पर्यावरण कायद्याअंतर्गत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अमोल म्हात्रे यांनी केली आहे.
दरम्यान; वसई-विरार परिसरातील अनेक जागांवर माती भराव झाल्याच्या तक्रारी शेकडो तक्रारी आतापर्यंत तहसील कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यावर तितक्याच नोटिसा काढून संबंधितांविरोधात सुनावणी सुरू आहेत. यातील अनेक प्रकरणांत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तर दंड न भरलेल्या प्रकरणांत संबंधित जागा मालकांच्या सातबारावर बोजा चढविण्यात आलेला आहे. मात्र भूमाफियांच्या या प्रयत्नांत आतापर्यंत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडालेला आहे. हा प्रकार तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी गांभीर्याने घेत नसल्याने किंबहुना बहुतांश प्रकरणांत भूमाफियांना पाठिशी घालण्यात येत असल्याने या प्रकारांत वाढ झालेली आहे. त्यामुळे वसई-विराकरांत प्रचंड रोष आहे.
What's Your Reaction?






