विंधन विहिरींच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांना पाणीटंचाईपासून दिलासा; महापालिकेचा ५२ लाखांचा निधी मंजूर

विंधन विहिरींच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांना पाणीटंचाईपासून दिलासा; महापालिकेचा ५२ लाखांचा निधी मंजूर

भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील जुने आदिवासी पाडे व दाट लोकवस्ती असलेल्या परिसरांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने या समस्येवर उपाययोजना म्हणून विंधन विहिरी (बोअरवेल) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी सुमारे ₹५२ लाखांचा खर्च करण्यात येणार असून, आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी यास शासकीय ठरावाद्वारे मंजुरी दिली आहे.

उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्यामुळे पाड्यांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासते. अनेक भागांत पारंपरिक विहिरी व लहान नद्या देखील आटल्यामुळे पाणीपुरवठा अडचणीत येतो. महापालिकेकडून काही ठिकाणी टँकरद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी, काही भागांमध्ये रस्त्यांची अडचण व पायाभूत सुविधा नसल्यामुळे टँकर पोहोचविणे अशक्य होते.

या पार्श्वभूमीवर विंधन विहिरींची उभारणी हा दीर्घकालीन व शाश्वत उपाय असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. विहिरींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच पाण्याची उपलब्धता वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने एकीकडे शहरातील नागरी भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा संकल्प हाती घेतला असतानाच, आदिवासी पाड्यांतील पाणीटंचाईलाही गांभीर्याने घेतले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता या पाड्यांना मोफत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे.

लवकरच विंधन विहिरींच्या उभारणीला सुरुवात होणार असून, या उपक्रमामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow