विरारच्या जलतरण तलावात स्मशानभूमीची राख; आरोग्याला धोका निर्माण

वसई: विरारच्या फुलपाडा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तलावातील पाण्यात चक्क स्मशानभूमीतील राख मिसळली जात आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या राखीमुळे जलतरण तलावाचे पाणी दूषित झाले असून, आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे.
विरार पूर्वेतील फुलपाडा येथे वसई विरार महापालिकेने जलतरण तलाव उभारला आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव मानले जात आहे. या तलावात शहरातील नागरिक पोहण्यासाठी येतात, तसेच पोहण्याचा सराव करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी या तलावातील पाणी दूषित असल्याचे आणि त्याच्या चवीतही बदल झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. सुरवातीला याचे कारण धूळ साचणे किंवा पाणी दूषित होणे वाटले, परंतु नंतर याचे धक्कादायक कारण समोर आले.
तलावाच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीमधून मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तयार होणारी राख हवेद्वारे जलतरण तलावात पडत आहे. स्मशानभूमीतील राख व धूर या तलावात सहजपणे येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यामुळे पोहण्यासाठी येणाऱ्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, कारण पोहताना पाणी तोंडात गेले तर ते दूषित होऊ शकते.
तलावाच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था नाही, आणि भिंतही अपुरी आहे, त्यामुळे राख जलतरण तलावात येत आहे. या गंभीर समस्येवर महापालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकाराबाबत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना कळवण्यात आले. त्यांनी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्त पवार यांनी सांगितले की, “हा प्रकार गंभीर आहे. नेमकी काय समस्या आहे ते पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जातील.”
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या सुरक्षिततेची तात्काळ पाहणी होणे आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
What's Your Reaction?






