विरार - जगप्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विरारमध्ये 'उत्सव गप्पांचा' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आगाशी गावचे रहिवासी आणि चित्रकार फिलिप डिमेलो यांच्या घराच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गायतोंडे यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक यांनी केले. चित्र प्रदर्शनासोबतच गायतोंडे यांच्या चित्र शैलीची वैशिष्ट्ये, त्यांच्या केलेची निर्मिती प्रक्रिया याविषयीची मते यावेळी उपस्थित कलाप्रेमींना ऐकता आली.  

या चर्चसत्रात चित्रकार सतीश नाईक, स्वीटी जोशी व संजय सावंत आदी मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी गायतोंडे यांच्या कला निर्मिती प्रक्रियेविषयी चित्रकार व स्तंभ लेखक माधव इमारते यांनी मान्यवरांशी संवाद साधला. 'मानवाकृती जड वाटू लागल्या म्हणून गायतोंडे अमूर्ततेकडे वळले. ते घडत गेले तशी त्यांची चित्रं घडत गेली. त्यांच्या चित्रातला अवकाश पाहणाऱ्याला प्रभावित करीत असतो कारण गायतोंडे म्हणजे आसक्ती आणि विरक्तीचा संगम होता.' असे मत चिन्ह या नियतकालिकाचे संपादक सतीश नाईक यांनी मांडले. तर चित्र समजून घेण्याच्या प्रक्रियेविषयी बोलतानाच, 'सध्या झटपट रंगाचा कारखाना उघडला आहे त्यामुळे पेशन्स व मेडिटेशन हरवल्यामुळे चित्रांना प्रतिसाद मिळत नाही.' अशी खंत चित्रकार संजय सावंत यांनी व्यक्त केली. तसेच सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांनी यावेळी गायतोंडे यांच्याशी असलेल्या आपल्या प्रदीर्घ मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. 

गायतोंडे यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी तसेच नवीन पिढीला त्यांची ओळख व्हावी यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असे आजोजक फिलिप डिमेलो आपल्या मनोगतात म्हणाले. या कार्यक्रमासाठी वसई व मुंबई परिसरातील नामवंत चित्रकार व साहित्य रसिक उपस्थित होते.