विरार: पालिकेच्या मोफत बस प्रवास पाससाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, नवीन ई-बसेस ताफ्यात

विरार: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमार्फत जेष्ठ नागरिक, दिव्यांग, कर्करोगपीडित आणि डायलेसिस घेत असलेल्या नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘मोफत बस प्रवास योजने’च्या नूतनीकरणाची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ नागरिकांना आपले पास वेळेवर नूतनीकरण करता न आल्यामुळे देण्यात आली आहे.
मोफत बस पासची मुदत ३१ मार्च रोजी संपली होती. या संदर्भात माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्तांकडे मुदतवाढीची मागणी केली होती. आयुक्तांनी ही मागणी विचारात घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
नूतनीकरणासाठी दिलेल्या मुदतवाढीमुळे नागरिकांना ३१ मार्चपर्यंत असलेल्या जुन्या पासवर प्रवास करता येईल. तसेच २०२५-२०२६ या वित्तीय वर्षासाठी नवीन अर्ज जवळच्या प्रभाग समिती कार्यालयांमध्ये उपलब्ध असतील. आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नागरिकांना नवीन अर्ज भरून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नवीन ई-बसेसने सेवा अधिक प्रभावी
सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडे १४७ बसेस असून त्या ३६ मार्गांवर सेवा देत आहेत. दररोज ६० ते ६५ हजार प्रवासी या बसेसने प्रवास करतात. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे या बसेस अपुऱ्या पडत होत्या.
यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत निधी मिळवून नवीन ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला ५७ ई बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून त्यातील ४० ई बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता १७ नवीन ई बसेससाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या नवीन बसांनी नवीन मार्गांवर किंवा जिथे अद्याप सेवा सुरू नाही अशा भागांत परिवहन सेवा उपलब्ध होईल, असे महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक चांगली आणि सोयीस्कर परिवहन सेवा मिळेल, याची खात्री पालिकेने दिली आहे.
What's Your Reaction?






