संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाकडून संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता संजय वर्मा हे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत.
संजय वर्मा हे मुळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते गेले तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सध्या ते कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यासाठी त्यांनी एक निश्चित यंत्रणा तयार केली आणि गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचा तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी राज्यात तब्बल दोन हजारांहून अधिक तज्ज्ञांची टीम तयार केली.
रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाची मागणी कॉग्रेसने केली होती. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांची बदली पोलीस महासंचालक पदी करण्यात आली होती.
What's Your Reaction?






