दहीहंडी 2025: कोकण नगर गोविंदा पथकाने रचला 10 थरांचा मानव मनोरा, मिळवला ₹२५ लाखांचा बक्षीस, वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

मुंबई, १६ ऑगस्ट २०२५: मुंबईत यंदाची दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी होत असताना, नेहमीप्रमाणे 'जय जवान' नव्हे तर जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने इतिहास रचला आहे. १० थरांचा मानव मनोरा रचून त्यांनी प्रेक्षकांना थक्क केले आणि नाव कमावले.
हा ऐतिहासिक विक्रम ठाण्याच्या वर्तकनगर येथील दहीहंडी महोत्सवात घडला, जिथे संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले होते.
दुपारी अनेक गोविंदा पथके प्रयत्न करत असतानाच, कोकण नगर पथकाने १० थरांचा अचूक मनोरा रचला आणि ₹२५ लाखांचे बक्षीस पटकावले. हा थर पूर्णपणे सुरक्षित आणि संतुलित होता, ज्यामुळे संपूर्ण प्रेक्षकवर्ग आश्चर्यचकित झाला.
जोगेश्वरीतील कोकण नगर भागातील हे पथक, गेल्या १२ वर्षांपासून कोच विवेक कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ३८ वर्षीय कोच कोचरेकर यांनी शिस्त आणि संघटनशक्तीचा आदर्श दाखवून हा विक्रम घडवून आणला. त्यांच्या पथकाला परिसरात 'शिस्तबद्ध आणि अचूक पथक' म्हणून ओळखले जाते.
२०१२ मध्ये 'जय जवान गोविंदा पथकाने' १३.३४ मीटर उंच (सुमारे ४३.७९ फूट) ९ थरांचा मनोरा रचून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवले होते. २०२२ मध्ये त्यांनी ५० फूट उंचीचा मनोरा रचून पुन्हा एकदा चर्चेत आले.
मात्र, २०२५ हे वर्ष कोकण नगर गोविंदांचं ठरलं आहे. त्यांच्या १० थरांच्या मानव मनोऱ्याने एक नविन मैलाचा दगड गाठला असून, हा क्षण दहीहंडीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
What's Your Reaction?






