सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : घड्याळ चिन्ह कोणाच्या राष्ट्रवादी पक्षाला

नवी दिल्ली : येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येऊ नये म्हणून शरद पवार गटाने २ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी देत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. अजित पवार गटाला चिन्ह वापरण्याची परवानगी देतानाच या चिन्हासोबतच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागेल असे नमूद केले. तसेच यासंदर्भात अजित पवार गटाला नवीन प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाला सादर करावे लागणार आहे. सर्वोच्च न्ययालयाच्या आदेशानुसार आम्ही निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला परवानगी तर मिळाली आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटीचे पालन करावे लागणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपते आहे तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा म्हणून शरद पवार गटाचं म्हणणं होतं. राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटाला घड्याळ हे चिन्ह वापरता येऊ नये म्हणून शरद पवार गटाने ही याचिका दाखल केली होती. मात्र त्याआधीच १९ मार्चला झालेल्या सुनावणीत अटींचे पालन करत घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला वापरता येईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. निवडुकांच्या पार्श्वभूमीवर चिन्हांवरून सुरु असणाऱ्या या वादामुळे भविष्यात हे चिन्ह कोणत्याही अटींशिवाय अजित पवार गटाला मिळतं की दोनही पक्षांना हे चिन्ह वापरता येणार नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
What's Your Reaction?






