सुवर्ण’ प्रमाणपत्राने सन्मानित:बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी (दक्षिण) विभागाची पर्यावरणपूरक कामगिरी

मुंबई, १ ऑगस्ट २०२५ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी (दक्षिण) कार्यालयाने पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजनांचा उत्कृष्ट अवलंब केल्याबद्दल इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून ‘सुवर्ण’ (गोल्ड) प्रमाणपत्र मिळवले आहे. ही मान्यता आयजीबीसीच्या ‘हरित विद्यमान इमारत श्रेयांक पद्धती’ (Green Existing Building Rating System) अंतर्गत देण्यात आली आहे.
या यशामागे अनेक कल्पक योजना व उपक्रमांचा समावेश आहे. जी (दक्षिण) कार्यालयाने स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्माण, जल संवर्धन, सांडपाणी प्रक्रिया, ऊर्जाबचत, शाश्वत कचरा व्यवस्थापन, तसेच आरोग्यदायी वातावरण निर्मिती या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या कार्यासाठी विभागाने खालील सुविधा राबवल्या:
-
२० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प
-
१० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP)
-
१३१ घनमीटर क्षमतेची पावसाचे पाणी साठवण टाकी
-
संपूर्ण कार्यालयात एलईडी लाइट्स व जलमापकासह कार्यक्षम उपकरणे
-
१००% कचरा वर्गीकरण आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प
-
पर्यावरणपूरक स्वच्छता रसायनांचा वापर
या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी तत्कालीन व विद्यमान सहायक आयुक्त, उपायुक्त आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. तत्कालीन सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे आणि मृदुला अंडे यांनी संकल्पना पुढे नेली, तर विद्यमान सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अंतिम सादरीकरण व मानांकन प्रक्रिया पूर्ण झाली.
भारतीय उद्योग महासंघाच्या (CII) अंतर्गत कार्यरत IGBC ही संस्था भारतातील हरित इमारतींच्या चळवळीसाठी कार्यरत आहे. ‘प्लॅटिनम’, ‘गोल्ड’, ‘सिल्व्हर’ आणि ‘सर्टिफाइड’ अशा विविध श्रेणींमध्ये ही मान्यता दिली जाते. त्यातील ‘गोल्ड’ प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने उच्च गुणवत्ता प्राप्त करणे होय.
या संदर्भात, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी सांगितले की, “महानगरपालिका प्रशासन पर्यावरणपूरक विकासासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. कार्यालयीन इमारतींमध्ये राबवण्यात येणाऱ्या हरित उपक्रमांना अशा राष्ट्रीय पातळीवरील सन्मानाची प्राप्ती ही आमच्या प्रयत्नांची पोचपावती आहे.”
What's Your Reaction?






