३५ व्या भव्य कला क्रीडा महोत्सवासाठी वसई नगरी सज्ज; आयोजनाची तयारी पूर्ण
यंग स्टार ट्रस्ट विरार, वसई विरार शहर महानगरपालिका तसेच वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या सहकार्याने वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे ३५ वर्ष असून, या निमित्ताने 'आपल्या भारताची वैभवशाली गाथा' ही विशेष कलाकृती साकारण्यात येणार आहे.

वसई - वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे यंदा ३५ वे वर्ष असून या कार्यक्रमाचे आयोजन पूर्ण झाले आहे. यावर्षी अनेक नव्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान हा महोत्सव वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानात आयोजित केला जातो. यंदा ५५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे. वसई कला क्रीडा महोत्सव हा संपूर्ण वसई तालुक्यात प्रसिद्ध असून परिसरातील विद्यार्थी आणि स्पर्धक दरवर्षी या महोत्सवात उत्साहाने सहभागी होत असतात.
२६ डिसेंबर रोजी होणार उद्घाटन
महोत्सवाचे उद्घाटन २६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:३० वाजता नरवीर चिमाजी आप्पा मैदान, वसई येथे होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन मराठीतील प्रसिद्ध नाट्य सिनेमा दिग्दर्शक केदार शिंदे, माजी कसोटीपटू संजय बांगर आणि पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मान्यवर अतिथी पाहुणे म्हणून खासदार हेमंत सावरा, आ. स्नेहा दुबे-पंडित, आ. राजन नाईक, आ. विलास तरे, माजी आ. क्षितिज ठाकूर, माजी आ. राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, प्रथम माजी महापौर राजीव पाटील आणि इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माजी आ. हितेंद्र ठाकूर असणार आहेत.
कला क्रीडा विभागात एकूण ७२ स्पर्धा असणार
या महोत्सवात कला क्रीडा महोत्सवात एकूण २४ प्रकारच्या तर क्रीडा विभागात एकूण ३८ प्रकारच्या स्पर्धा विविध वयोगटात होणार आहेत. क्रीडा विभागात कब्बडी, बॅडमिंटन, शरीर सौष्ठव, खो-खो, व्हॉलीबॉल, शुटींग बॉल, कराटे, टेबल टेनिस यासोबतच तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मिस्टर पर्सनालिटी व मिस पर्सनालिटी स्पर्धेसोबतच कला विभागात एकांकिका, लोकनृत्य, रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
यंदा नव्या चार स्पर्धांचा समावेश
या वर्षी महोत्सवात स्व्कॅश, दहीहंडी, ज्युदो कराटे आणि महिलांसाठी लाठीकाठी या चार नव्या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या 'बेस्ट फिजिक मेन' आणि 'डान्स वसई डान्स' या स्पर्धा यावर्षी देखील घेतल्या जाणार आहेत.
३५ व्या वर्षानिमित्त 'आपल्या भारताची वैभवशाली गाथा' ही विशेष कलाकृती
१९९० मध्ये लोकनेते माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या महोत्सवाचे यंदा ३५ वे वर्ष असून यानिमित्ताने 'आपल्या भारताची वैभवशाली गाथा' ही विशेष कलाकृती साकारण्यात येणार आहे. या कलाकृतीत भारताचे सांस्कृतिक वैभव, प्रगती आणि लष्करी सामर्थ्याची झलक पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीयत्वाची भावना दृढ व्हावी म्हणून सदर कलाकृती साकारण्यात येणार आहे. जी.जी महाविद्यलयासमोर असणाऱ्या वसई विकास बँकेच्या मुख्य कार्यालय येथे हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
३१ डिसेंबरला महोत्सवाचा समारोप होणार असून या कार्यक्रमासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी ८ वाजता मराठी-हिंदी सुमधुर गीतांचा और्कस्ट्रा हा जीवनगाणी प्रस्तुत कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात सहभागी होऊन विविध कला-क्रीडा स्पर्धांसोबतच आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी अंडी कला-क्रीडा प्रेमींना घ्यावा असे आवाहन कला क्रीडा महोत्सवाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






