३५ व्या वसई कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन; स्पर्धेसाठी १४ तारखेपर्यंत अर्ज भरता येणार

वसई - वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची बैठक नुकतीच क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आली होती. यावर्षी 35 व्या वर्षानिमित्त महोत्सवावरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. स्मरणिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्पर्धकांच्या सोयीसाठी स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज वसई, नालासोपारा आणि विरार अशा अनेक ठिकाणी वाटपासाठी ठेवले आहेत. हे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही १० डिसेंबर होती मात्र, शाळेतील क्रीडा शिक्षक यांना यावर्षी अतिरिक्त शासकीय कामे असल्याकारणाने शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच सर्व स्पर्धकांना या महोत्सवात सहभागी होता यावे यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत चार दिवस वाढवण्यात आल्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
आता १४ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वसईतील क्रीडा मंडळ येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुक्यातील स्पर्धकांना कला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवता येणार आहे तसेच त्यांच्या कलागुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळेल अशी भावना कला क्रीडा महोत्सवाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी व्यक्त केली.
यावर्षी नवीन स्पर्धांमध्ये स्कॅश हि स्पर्धा दत्तानी क्लब येथे होणार आहे. तर १६ संघामध्ये दहीहंडी ही स्पर्धा होणार आहे. महिला स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी व जुडो या स्पर्धा होणार आहेत.
क्रीडा मंडळ वसई येथे झालेल्या बैठकीस केवल वर्तक, अनिल वाझ, माणिकराव दुतोंडे, मकरंद सावे, राजेश जोशी, विलास पगार, माजी नगरसेविका ज्योती धोंडेकर आणि नीतिशा पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?






