घोडबंदरमध्ये पाणी टाकी सफाईदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू, परिसरात शोक

घोडबंदरमध्ये पाणी टाकी सफाईदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू, परिसरात शोक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर येथील आनंदनगर भागातील एका इमारतीतील पाण्याची टाकी सफाई करत असताना बेशुद्ध पडलेल्या एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतक कर्मचाऱ्याचे नाव अनमोल अर्जुन भोये असून तो ठाणे शहरातील मानपाडा येथील टिकूजीनीवाडी भागातील कोकणीपाडा या परिसरातील रहिवासी होता. तो मे. ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा कर्मचारी होता. आनंदनगर भागातील एक दहा मजली इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करण्याचे काम ही कंपनी करत होती.

शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता अनमोल भोये इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करत होता. यावेळी अचानक तो बेशुद्ध होऊन टाकीमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मे. ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी टाकीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनमोल भोयेला बाहेर काढले.

त्याला रुग्णवाहिकेतून ओवळा येथील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow