वसई, २१ मे: नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास साई सिमरन अपार्टमेंट या चार मजली इमारतीतील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत अडकून पडलेल्या १४ वर्षीय मुलगा आणि ४७ वर्षीय महिलेला वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच सुखरूप बाहेर काढले.

साई सिमरन इमारत सुमारे १३ ते १४ वर्षे जुनी असून, त्यात एकूण २२ सदनिका आणि ३ व्यावसायिक गाळे आहेत. स्लॅब कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रहिवाशांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेतले आणि अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीतील सर्व २२ खोल्या खाली करून तेथील नागरिकांना जवळील जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

ही घटना घडल्याने नालासोपारा परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका या धोकादायक इमारतींच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.