फनस्ट्रीट सनडे ला उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांबरोबरच ज्येष्ठही रमले विविध खेळांत

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग ,जागरुक नागरिक संस्था वसई व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फनस्ट्रीट सनडे हा कार्यक्रम रविवारी पार पडला या कार्यक्रमात एरव्ही मोबाईलवर रमणारी मुले विविध खेळात रमल्याचे चित्र दिसले. तर जेष्टानीही पुन्हा एकदा आपले बालपण अनुभवले. या कार्यक्रमाला नालासोपारा मतदार संघाचे आमदार राजन नाईक, माजी नगरसेवक प्रविण म्हाप्रळकर,क्रीडा विभाग सहाय्यक आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस, प्रभाग समिती ई च्या सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील, सहाय्यक आयुक्त अजय चौकेकर, जेएनएस संस्थेतर्फे अध्वरी कुलकर्णी, नारी प्रेरणा प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अंकिता नाईक, क्रीडा विभागाचे गणेश पाटील, दिगंबर पाटील आदि उपस्थित होते.
नालासोपारा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी हजारों नागरिक व विद्यार्थी यांना आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळालें. मनमोकळेपणाने जेष्ठ विविध खेळात भाग घेऊन आपल्या जुन्या आवडी पुन्हा एकदा जगताना दिसत होते. मुले तर हातातील मोबाईल बाजूला ठेऊन खेळत होती . पण त्याच वेळी महिलाही आपल्यातील विविध कलागुण दाखवत होत्या. कोणी दोरीवरील उड्या मारत होत्या तर कोणी सायकलिंगचा आनंद घेत होत्या. आज झालेल्या फनस्ट्रीट मध्ये मलखांब,महिलांसाठी मंगळागौर,भजन ,स्केटिंग,कराटे, झुम्बा ,सायकलिंग ,दोरी उड्या , चित्रकला,कॅलिग्राफी,याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पहिल्यांदाच नालासोपारा येथे आयोजित केलेल्या फनस्ट्रीट या उपक्रमाला आमदार राजन नाईक यांनी शुभेच्छा दिल्या व असेच नाविन्यपूर्ण उपक्रम वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकरीता राबविले जातील असे आश्वासन दिले.तर आता दरवर्षी प्रमाणे रविवार १६ फेब्रुवारी ला देखील वसईतील दत्तानी मॅाल येथील रस्त्यावर फनस्ट्रीट सनडे चे आयोजन महापालिका व विविध सेवा भावी संस्थांच्या सहकार्याने करण्यांत आले आहे.
What's Your Reaction?






