बांद्रात ५२ फूट उंच काशी विश्वनाथ मंदिराची भव्य आरास; अहिल्याबाई होळकरांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त गौरव

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध ठिकाणी आकर्षक देखावे उभारले जातात, पण दरवर्षी बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्याला काही वेगळं आणि भव्य सादर करत असतं. यंदा मंडळाच्या ३०व्या वर्षात, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ५२ फूट उंच काशी विश्वनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती बांदण्यात आली आहे. हे मंदिर देखावे म्हणून साकारले गेले असले तरी त्याची कलाकुसर, भव्यता आणि धार्मिक पवित्रता पाहून हे एक भावनिक आध्यात्मिक अनुभव ठरत आहे.
ही प्रतिकृती उत्तर भारतातील नागर शैलीतील असून, मंदिराचा ‘शिखर’, कोरीव स्तंभ आणि गर्भगृहात असलेला शिवलिंग सर्व काही अत्यंत बारकाईने आणि मूळ मंदिराच्या समरूप साकारण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात शेकडो पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशात झगमगाट निर्माण करण्यात आला आहे, जो पाहणाऱ्यांना मोहित करतो. विशेषत: तरुणांमध्ये या देखाव्याची मोठी चर्चा आहे.
या मंडळाचे प्रमुख सल्लागार भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार ॲड. आशिष शेलार असून, गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ देशातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना देखाव्यांमधून सादर करत आले आहे. स्वामी विवेकानंद स्मारक, केदारनाथ, उज्जैनचे महाकाल मंदिर, पंढरपूर, शिर्डी आणि टिळकांचे रत्नागिरीतील वाडा – अशा अनेक देखाव्यांनी मंडळाने गणेशोत्सवात वेगळा ठसा उमटवला आहे.
काशी विश्वनाथ मंदिर हे भारतातील एक अत्यंत पूजनीय ज्योतिर्लिंग आहे. ते वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पश्चिम किनारी स्थित असून, असे मानले जाते की येथे दर्शन घेणं आणि गंगेत स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते. मुघल आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने मूळ मंदिर पाडले होते, मात्र अहिल्याबाई होळकरांनी १८व्या शतकात त्या स्थळी मंदिराची पुन्हा उभारणी केली. त्यांच्या या कार्याच्या स्मरणार्थ बांद्राच्या मंडळाने ही प्रतिकृती उभारली आहे, जी त्यांच्या कार्याला एक श्रद्धांजली ठरते.
मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी सांगितले की, "गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही मंडळाने इतिहास, श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरातील शिवलिंग, दीप आरास आणि वास्तुशिल्प भक्तांच्या मनात आध्यात्मिक उर्मी जागवणारे ठरणार आहे."
राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंडळ विविध जनजागृती उपक्रमही राबवत आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ले, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि स्वदेशीचा जागर यांचा समावेश आहे.
बांद्रा रिक्लमेशन परिसरातील हा उत्सव म्हणजे विविध धर्म, जाती, आणि समुदायांचे एकत्रिततेचे प्रतीक बनले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळाच्या गणेशोत्सवाला चित्रपटसृष्टी, खेळ, राजकारण आणि समाजसेवेतील अनेक मान्यवर भेट देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?






