वसई: विरारमध्ये एका रिक्षाचालकाने मराठी भाषेचा अवमान केल्याच्या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. “मी मारहाणीचं समर्थन करत नाही, पण मराठीचा अपमान करणाऱ्या त्या मुजोर रिक्षाचालकाला धडा शिकवणारा देखील मराठीप्रेमी उत्तर भारतीयच होता,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी नायगाव येथील शिवसेना शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात केले.

शनिवारी विरारमध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठी भाषेविषयी अश्लील आणि अवमानकारक भाषेत बोलल्याने संतप्त शिवसैनिकांनी त्याला चोप दिला. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “त्याला विचारले गेले ते मराठीच्या सन्मानासाठी, आणि ज्या व्यक्तीने त्याला जाब विचारला व नंतर धडा शिकवला, तो स्वतः उत्तर भारतीय आहे.

त्याचं नाव जाहीर केलं, तर पोलीस त्याच्या घरी जातील.”ठाकरे यांनी सांगितले की, “कोविडच्या काळात महाराष्ट्राने उत्तर भारतीय, विशेषतः बिहारी लोकांची काळजी घेतली. आम्ही कधीही त्यांना मराठी किंवा हिंदी बोलायला सांगितले नाही. मात्र इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान करणार असेल, तर ते महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही.”आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी वसई आणि परिसरातील खराब रस्त्यांचा मुद्दा उपस्थित करत शिंदे सरकारवरही टीका केली. “महामार्गावर खड्डे पडलेत, त्यांचा लाडका ठेकेदार कोण आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवर सडकून टीका करत म्हटलं, “हे गद्दार आमदार व मंत्री ‘चड्डी-बनियान’, पैशांचे बॅग्स आणि दारूच्या बाटल्यांसोबतच दिसतात.”धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईच्या १६०० एकर जमिनीवर अदानी समूहाची नजर असून ती त्यांच्याकडे देण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकार रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते, आणि उपस्थितांमध्ये उत्साह आणि मराठी अस्मितेचा जोरदार उत्सव पाहायला मिळाला.