लाडकी बहिण योजना;जिल्ह्यातून २ लाख ९६ हजार अर्ज दाखल,४२-हजार-४६७-अर्ज-अंशतः-त्रुटींमुळे-रद्द

लाडकी बहिण योजना;जिल्ह्यातून २ लाख ९६ हजार अर्ज दाखल,४२-हजार-४६७-अर्ज-अंशतः-त्रुटींमुळे-रद्द

वसई : प्रतिनिधी :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत शासन दरबारी सुमारे २ लाख ९६ हजार अर्ज दाखल झाले आहेत. मात्र यातील सुमारे ४६ हजार ४६७ अर्ज छाननीमध्ये अंशतः त्रुटींमुळे रद्द करण्यात आले आहेत. जे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्या अर्जातील त्रुटी  ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित महिलांनी दूर केल्यास त्या महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ मिळेल, अशी माहिती प्राप्त होत आहे. त्यामुळे अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी महिलांना पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.
 दरम्यान, दुसऱ्या बाजूला दोन लाख ४५ हजार अर्ज मंजुरीच्या टप्प्यात आहेत. सर्वात जास्त अर्ज वसई तालुक्यातून दाखल करण्यात आले आहेत. त्या खालोखाल पालघर तालुक्यातील असून सर्वात कमी अर्ज मोखाड्यामधून दाखल करण्यात आले आहेत. अर्जातील त्रुटींमुळे सर्वात जास्त अर्ज डहाणूतील रद्द करण्यात आले आहेत. त्या खालोखाल वसई असून सर्वात कमी रद्द अर्ज मोखाडा तालुक्यातून झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त स्वीकारलेले अर्ज वसईतील आहेत. त्या खालोखाल पालघर, तर सर्वात कमी अर्ज मोखाडा तालुक्यातून मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी आवश्यक कागदपत्रे, पुराव्यासह ३१ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत, असे जिल्हा स्तरावरून सूचित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून प्राप्त असणाऱ्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याच्या संकेतस्थळावर मोबाईल प्लिकेशनद्वारे नव्या नोंदणी करण्याची प्रक्रिया काही काळ स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नुकतीच अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने या नव्याने नोंदणी करण्यास आरंभ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

१७ ऑगस्टला मिळणार दोन हप्ते !!
लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना १७ ऑगस्ट रोजी लाभ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्णत्वास आल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईल प्लिकेशन, तसेच संकेतस्थळाद्वारे योजनेतील निर्णय करण्यासाठी व्यवस्था सुरू झाली नसल्याने अनेक ठिकाणी सामाजिक व राजकीय संस्थांमार्फत ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची क्षेत्रनिहाय छाननी करून संबंधित अंगणवाडी सेविकेमार्फत हे अर्ज ऑनलाइन करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली.

त्रुटी दूर करण्याचे आवाहन
४२ हजारांहून अधिक अर्जांमध्ये विविध तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते अंशतः रद्द करण्यात आले आहेत. ज्या मोबाईलवरून हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्याच मोबाईलचा तपशील देण्यात आला आहे. त्या मोबाईलवरून त्रुटी दूर करणे शक्य होणार असल्याचे महिला बालविकास विभागाकडून खुलासा करताना सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील अर्जांची आकडेवारी
तालुका प्राप्त अर्ज स्वीकार अंशतः रद्द
जव्हार २२,४२२ १९,४४६ २,९०६
मोखाडा १५,३३७ २५,२७० ९९२
डहाणू ४७,६४१ ३१,५९७ २२,३८४
पालघर ६२,१४१ ५३,२९५ ८,४८९
तलासरी २७,१२० २४,३०२ २,७९३
वसई ८९,९८२ ७४,५६९ १०,९७५
विक्रमगड १८,४०६ १७,०५४ १,३५२
वाडा २२,९५६ २०,२१० १,३३९
एकूण २,९६,००५ २,४४,७४३ ४२,४६७

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow