वसई : ट्रक टर्मिनलचा अभाव, महामार्गावर अवजड वाहने उभी राहिल्याने वाहतूक विस्कळीत

वसई : मुंबई-गुजरातला जोडणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक टर्मिनलच्या अभावामुळे अवजड वाहने रस्त्यावरच उभी राहत आहेत. यामुळे महामार्ग अरुंद होत असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. अपघातांची शक्यताही यामुळे वाढली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर या भागांना जोडणाऱ्या या महामार्गावर दररोज सुमारे २० ते २५ हजार वाहने वावरत आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के वाहने ही मालवाहतूक करणारी आहेत. या वाहनांना विश्रांती, माल भरणे-उतरविणे यासाठी थांबावे लागते. मात्र, ट्रक टर्मिनलची सुविधा नसल्याने ही वाहने थेट मुख्य रस्त्याच्या मार्गावरच उभी केली जात आहेत.
रात्रीच्या वेळेस ही वाहने अंधारात नजरेस न पडल्यामुळे अपघातही घडत आहेत. महामार्गावर वाहतूक कोंडी होणे, नागरिकांना त्रास होणे, तसेच गावपाड्यांच्या संपर्क मार्गावर अडथळा निर्माण होणे, हे सर्व परिणाम या समस्येमुळे होत आहेत.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील मिश्रा म्हणाले की, “वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.”
दरम्यान, ट्रक टर्मिनलसाठी नियोजन करण्यात आले असले तरी जागेअभावी हे काम अर्धवट राहिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी दिली. “जर जागा उपलब्ध झाली, तर ट्रक टर्मिनल उभारण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी करण्यात आली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. सेवा रस्त्यांचीही अवस्था दयनीय असून काही ठिकाणी वाहनचालकांनी अतिक्रमण करून रस्ता अडवून ठेवला आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज नागरिक व वाहतूकदार व्यक्त करत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
What's Your Reaction?






