वसई-विरार महापालिकेचा मालमत्ता करातून 111.52 कोटींचा वाढीव उत्पन्न; 15 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी!

विरार : मागील 15 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता कर या वर्षात वसूल करण्यात वसई-विरार शहर महानगरपालिकेला यश आलेले आहे. वित्तीय वर्ष 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 रोजीपर्यंत मालमत्ता कराचे 384.55 कोटी जमा झाले असून, आठ कोटी रुपयांचे धनादेश जमा असून आजमीतीस एकूण 392.55 कोटी इतकी मालमत्ता करापोटी वसुली करण्यात आल्याची माहिती वसई-विरार महापालिका मालमत्ता विभागातून देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 10,08,022 इतक्या मालमत्ता असून त्यापैकी 62,2,288 इतक्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरणा केलेला नाही अशा 12104 मालमत्ता सील करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. वित्तीय वर्ष 2024-025 मध्ये नवीन निवासी मालमत्ता 22,671 व वाणिज्य मालमत्ता 11,299 असे एकूण मिळून 111.52 कोटी रुपये वाढीव उत्पन्न पालिकेला मिळालेले आहे. नागरिकांनी वित्तीय वर्ष 2024-2025 मध्ये मालमत्ता कर भरून महानगरपालिकेस सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे वित्तीय वर्ष 2025-2026 मध्ये थकबाकीची 100% वसुली करण्याकरता महानगरपालिकेकडून कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. 2024-25 या वित्तीय वर्षात मालमत्ता कर वसुलीचे 384 कोटी 57 लाखांचे लक्ष्य महापालिकेने ठेवलेले होते. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने 31 डिसेंबर 2024 पर्यंत 254.34 कोटी इतका मालमत्ता कर वसूल म्हणजेच ठरविलेल्या उद्दिष्टापैकी 50.40 टक्के कर वसूल करण्यात पालिकेला यश आलेले होते. महानगरपालिका हद्दीत थकित मालमत्ता धारकाकडून मोठ्या प्रमाणात कर येणे बाकी आहे; अशा मालमत्ता धारकांकडून मालमत्ता कर वसूल करण्याच्या हेतूने आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, ज्या मालमत्ताधारकांनी वर्षानुवर्षे आपल्या मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही; अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्ता कराच्या प्रति प्राप्त होणारी रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व कराधान नियम प्रकरण 8 अन्वये मालमत्ता जप्त करणे व त्यांचा लिलाव करण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केलेली होती.
याअंतर्गत उच्चतम थकित मालमत्ता करधारकांना जप्तीपूर्व नोटीस बजावणे, जप्तीपूर्व नोटीस बजावलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता महापालिकेमार्फत निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार जप्त करणे, जप्त मालमत्तांची माहिती दर्शनी भागात, चौकात लावणे, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करणे, मूल्यांकन करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी जिल्हास्तरीय वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करणे आणि मालमत्ता लिलाव करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येत होती. दरम्यान; अशा कटू कार्यवाही अथवा कारवाईला सामोरे जायचे नसेल तर मालमत्ता धारकांनी थकित कराचा भरणा तात्काळ करावा, असे आवाहनही वसई-विरार महापालिका मालमत्ता कर विभागाने केलेले होते. या सगळ्याचे परिणाम म्हणून मालमत्ता करात अपेक्षित वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे; महानगरपालिकेमार्फत मुदतीत कर भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना देण्यात आलेल्या सूटचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे. त्यामुळे पहिल्या तिमाहीत महानगरपालिकेला मालमत्ता करापोटी 83.34 कोटींची वसुली करता आली होती.
माहे जून 2024 अखेरपर्यंत 1,76,762 इतक्या मालमत्ता धारकांनी कर भरणा केलेला होता. त्यापैकी 37.70% ऑनलाईन व 62.30% ऑफलाईन पद्धतीने कर भरणा झालेला होता. 2023-24 या वित्तीय वर्षात 30 जून 2023 अखेरपर्यंत 73.60 कोटी इतका मालमत्ता कर वसूल करण्यात आलेला होता. पण मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी माहे जूनअखेरपर्यंत मात्र 10.04 कोटी इतकी वाढ झालेली होती. मालमत्ता कर हा सक्तीचा व प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. मालमत्ता कर संकलन विभागाकडे आजमितीस 9 लाख 60 हजार 838 इतक्या मिळकती आहेत.
या मधील 8 लाख 12 हजार 567 मालमत्ता निवासी, तर 1 लाख 48 हजार 271 इतक्या मालमत्ता अनिवासी आहेत. मालमत्ता करात वाढ होण्याकरता महापालिका हद्दीतील ज्या मालमत्तांवर कर आकारणी झालेली नाही; अशा मालमत्ता शोधून त्यावर कर आकारणी करण्यास प्राधान्य क्रम देते. याशिवाय मालमत्ता कराची वसुली करण्याकरता मालमत्ता कर विभागामार्फत विविध प्रकारच्या विशेष मोहिमा हाती घेण्यात येतात. यात कर भरणा करणे, वसूल गोळा करणेकरता कॅम्प तसेच घरोघरी जाऊन कर संकलन करणे, याशिवाय जनजागृती करून कर संकलनाचे उद्दिष्ट साध्य केले जाते. मालमत्ता कर, मोबाईल टॉवरवरील कर, उपभोक्ता कर, नोटिस फी, व्याज, शिक्षण कर रिबेट व रोजगार हमी कर रिबेट इत्यादीतून 2023-24 मध्ये सुधारित अपेक्षित जमेसह 337 कोटी 92 लाखांचे लक्ष्य ठेवले होते. तर सन 2024-25 मध्ये 384 कोटी 57 लाखांचे लक्ष्य वसई-विरार महापालिकेन निर्धारित केलेले आहे. याच लक्ष्यपूर्तीकरता पालिकेने कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. ***
What's Your Reaction?






