वसई - "संपूर्ण आमदार निधी आम्ही वापरला असून आम्ही कामांसाठी दिलेल्या प्रस्तावांवर, " तुमच्या निधीच्या खर्चाची  मर्यादा संपलेली असून कामांची यादी कमी करण्यात यावी असे म्हटले आहे." असे उत्तर जिल्हा नियोजन समितीकडून आले असल्याचे आ. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनी ‘आमदार निधी` खर्च न केल्याने तो तसाच पडून राहतो किंवा परत जातो, असा अपप्रचार समाजमाध्यमांतून विरोधी पक्षांनी सुरू केलेला आहे. त्यासाठी एका वर्तमानपत्राची जुनी कात्रणं प्रसारित केली जात आहेत. वसईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ठाकुरांनी विरोधकांकडून सुरु केलेल्या अप्रचारावर सणसणीत उत्तर दिले आहे. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांनाही पाच वर्षांच्या कालावधीसाठी 103 कामांसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळालेला होता. विशेष म्हणजे; ठाकुरांनी त्यापेक्षा अधिक म्हणजेच; 18 कोटी 79 लाख 74 हजार 410 रुपयांचा निधी वसई विधानसभा क्षेत्रासाठी वापरात आणला आहे. त्यातही पुढील वर्षीच्या दायित्व रक्कमेचा समावेश आहे. आ. ठाकुरांकडून विकास कामांसाठी सादर केलेल्या प्रस्तावावर जिल्हा नियोजन समितीकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यात त्यांनी तुमच्या निधीच्या खर्चाची  मर्यादा संपलेली असून कामांची यादी कमी करण्यात यावी असे म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांकडून केवळ अप्रचार करण्याच्या हेतूने चुकीची माहिती पसरविली जात असल्याचे यावेळी ठाकुरांनी सांगितले. 

आ. निरंजन डावखरे, आ. भाई जगताप तसेच आ. जयंत पाटील यांचाही आमदार निधी हितेंद्र ठाकुरांनी वसई मतदारसंघासाठी मिळवून दिला होता. या आमदार निधीतूनही करोडोंची विकास कामे वसई मतदारसंघात करण्यात आली होती. त्यामुळे विकास कामे आणि आमदार निधीबाबत अपप्रचार करून राजकारण करणाऱ्या विरोधकांची बोलती बंद झाल्याचे दिसून येत आहे. 

तर मी दिलेल्या उत्तराला टाळ्या मिळाल्या असत्या

काही दिवसांपूर्वी वसईच्या जागरूक नागरिक संघाने आणि न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघाकडून 'विधानसभेसाठी आम्ही का ?' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या चर्चासत्रात काँग्रेसचे विजय पाटील यांनी आपला प्रतिनिधी पाठवला होता तर भाजपाच्या स्नेहा दुबे या गैरहजर होत्या. ठाकूर म्हणाले की, चर्चासत्रात पुरावा दाखवून जर मला हा प्रश्न विचारला असता तर मी दिलेल्या उत्तराला टाळ्या मिळाल्या असत्या." दरम्यान, विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या चर्चासत्राला दांडी मारल्याने आ. ठाकुरांनी आपण केलेल्या विकास कामांची यादी देत तसेच भविष्यातील योजना सांगत या सभेत बाजी मारली. इतर उमेदवार गैरहजर राहिल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.