वसईतील पाचूबंदर भागात बंद झालेल्या जागेवर बेकायदा कचरा डंपिंग केल्याने परिसरातील मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. शुक्रवारी, 23 ऑगस्ट रोजी वसई भाजपचे निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांसह व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या ठिकाणाची पाहणी केली.

पाहणी दरम्यान बेकायदा डंपिंगचे स्पष्ट चिन्ह आढळले. या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, मनोज पाटील यांनी त्वरित पालिकेच्या गाड्यांना या ठिकाणी कचरा टाकण्यास बंदी घालण्याची कारवाई केली आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

वसई-विरार महापालिका शहरातील कचरा संकलन आणि नालेसफाईसाठी प्रभागनिहाय 20 ठेकेदारांची नियुक्ती करून वार्षिक 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करते. तरीही, अनेक ठिकाणी कचरा मोकळ्या जागेत टाकला जात आहे. पाचूबंदर भागात बेकायदा डंपिंग केल्याने खाडीचे पाणी दूषित झाले असून, यामुळे मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, कचऱ्यामुळे खाडीत दलदल तयार झाली असून मत्स्य जीवन धोक्यात आले आहे. जैविक कचऱ्यामुळे परिसरात भटक्या प्राण्यांचे संक्रमण वाढले आहे, ज्यामुळे मानवी आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडत आहे.

या समस्येचा त्वरित निवारण करण्यासाठी मनोज पाटील यांनी वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. या पाहणीमध्ये स्थानिक नागरिक आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.