शेअर बाजार: शेअर बाजारात काही तरी मोठं होणार? इन्वेस्टमेंट गुरुकडे भरमसाठ कॅश पडून, हेच का मंदीचे संकेत?

मुंबई : जगभरातील शेअर बाजारात अलीकडे मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. यूएस रोजगारांच्या आकडेवारीने देश-विदेशातील शेअर मार्केटच्या हालचालींवर परिणाम टाकला असून आता पुन्हा एकदा शेअर बाजारात काहीतरी मोठं घडणार असं दिसत आहे. ETMarkets आणि प्राईम डेटाबेसच्या डेटा विश्लेषणातून २५० हून अधिक कंपन्यांच्या प्रवर्तकांनी या वर्षात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आणि ब्लॉक डीलद्वारे सुमारे ९७ हजार कोटींचा हिस्सा विकल्याचे आढळून आले आहे.
या कालावधीत लिस्टेड कंपन्यांच्या प्रवर्तकांनी ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे ७,३०० कोटींचे भागभांडवल विकले असून वेदांता सुमारे ३,१०० कोटींमध्ये हिंदुस्तान झिंकमध्ये १.५१% इक्विटी विकण्यासाठी ऑफर फॉर सेल घेऊन आली होती. तसेच जगातील आघाडीचे अब्जाधीश आणि गुंतवणूक गुरु वॉरेन बफे विक्रमी रोख रक्कम (कॅश) घेऊन बसले आहेत. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवेची रोख रक्कम, रोख समतुल्य आणि अल्पकालीन खजिना ८८ अब्ज डॉलरने वाढून २७७ अब्ज डॉलरच्या सर्वकालीन स्तरावर पोहोचला असून शेअर बाजारांनी उच्चांक गाठल्याचे हे लक्षण आहे का?
ब्रिटीश टेलिकॉम व्होडाफोनने इंडस टॉवर्समधील १५,३०० कोटींची हिस्सेदारी विकली असून भारतीय बाजारपेठेतील प्रवर्तकाकडून यावर्षी झालेली सर्वात मोठी विक्री आहे. सह-संस्थापक राकेश गंगवाल यांच्यासह देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन इंडिगोच्या प्रवर्तकांनी १०,१५० कोटींच्या विक्रीचा सपाटा लावला असून टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने ९,३०० कोटींचे TCS समभाग विकले आहेत. याशिवाय Mphasis, वेदांता, भारती एअरटेल, व्हर्लपूल ऑफ इंडिया, संवर्धन मदरसन, हिंदुस्थान झिंक, सिप्ला, NHPC आणि टिमकेन इंडियामध्येही मोठी स्टेक विक्री दिसून आली असून ऑफर फॉर सेलद्वारे आयपीओ मार्गाने देखील त्यात समाविष्ट केले तर यादी आणखी वाढेल.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी सांगितले की देशांतर्गत शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. तेजीच्या काळात (बुल मार्केट) मुल्यांकन अनेकदा शिखरावर असते आणि प्रवर्तकांना संभाव्य सुधारणांपूर्वी फायदा घ्यायचा असतो. बाजाराला या पातळीवर जास्त काळ कायम ठेवता येत नाही. परिणामी आता प्रवर्तक संधीचा फायदा घेत आहेत पण काही स्टॉक्समध्ये जेथे अलीकडे OFS किंवा ब्लॉक डील झाले आहेत, त्यांची सध्याची किंमत OFS किंवा ब्लॉक डीलच्या किमतीपेक्षा जास्त असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या संस्थात्मक ब्रोकिंगच्या संस्थापिका आणि प्रमुख अनिता गांधी म्हणतात की, बाजारातील उच्चांकी मूल्यांकन आणि भविष्यातील तेजीच्या संभाव्यतेमुळे प्रवर्तकांचे निर्गमन बाजार शिखरावर पोहोचण्याचे लक्षण नाही. सर्व भागविक्रीचे निर्णय नकारात्मक संभाव्यतेने प्रेरित नसतात. दीर्घकालीन दृष्टीकोनातून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सध्याची तरलता आणि मूल्यमापन यांचा फायदा घेऊन काही फक्त संधीसाधू असू शकतात.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता दिसून आली होती. अनेक अर्थतज्ञांनी मंदीचा काळ आधीच सुरू झाल्याचे म्हणणे असून यादरम्यान, वॉरेन बफे यांनी एका सौंदर्यप्रसाधन कंपनीत पैसे गुंतवले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे मंदीच्या काळात लिपस्टिकची विक्री वाढते, त्यामुळे बफे यांनी मंदीचा अंदाज वर्तवला आणि आता त्यातून पैसे कमवण्यासाठी सौंदर्यप्रसाधन कंपनीत गुंतवणूक करत असल्याचे मानले जात आहे. यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे.
What's Your Reaction?






