इंग्रजी मेसेजमुळे उघडकीस आले हत्येचे रहस्य; मालाडमधील हॉटेलमध्ये व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला

मुंबई- मिरा रोड मधील एका व्यापाऱ्याने केेलेली आत्महत्या ही हत्या असल्याचे एका इंग्रजी भाषेतील मेसेज मुळे उघड झाले आहे. आत्महत्येपूर्वी त्याने इंग्रजीतून पत्नीला मेसेज केला होता. मात्र आजवर कधीही इंग्रजीचा वापर न करणार्याने इंग्रजीतून मेसेज कसा केला असा संशय निर्माण झाला आणि या हत्येला वाचा फुटली. या व्यापार्याच्या प्रेयसीनेच त्याची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचे तपासा उघड झाले.
मिरा रोड मध्ये राहणार्या मन्सुरी (४७) याचा मालाड येथे व्यवसास आहे. रविवार ४ मे रोजी संध्याकाळी त्याच्या पत्नीला एक मेसेज आला होता. हा मेसेज मन्सुरीच्याच मोबाईलवरून आला होता. ‘मी आत्महत्या करत असून त्याला माझी पत्नी जबाबदार आहे..’ असे या मेसेज मध्ये लिहिलेेले होते. हा मेसेज पाहून मन्सुरी याच्या मुलाने त्वरीत नया नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा पत्ता शोधला. मालाडच्या शालीमार हॉटेल मधील एका खोलीत मन्सुरी याचा मृतदेह आढळळा होता. त्याच्या मृतदेह पलंगावर पडलेला अर्धनग्न अवस्थेत होता. मन्सुरी याने आत्महत्येपूर्वी पाठवलेला मेसेज इंग्रजीत होता. एरवी तो कघीही इंग्रजीत मेसेज करत नसे. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनानासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात मन्सुरी याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले.
मन्सुरीची हत्या कुणी आणि का केली त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला. मन्सुरी आदल्या दिवशी या हॉटेलमध्ये एका महिलेसबोत आला होता. हॉटेलच्या खोलीत एण्ट्री करण्यासाठी दोघांचे आधारकार्ड आवश्यक असतात. पोलिसांनी ते तपासले असता एक आधारकार्ड मन्सुरीचे तर दुसरे त्याच्या आईचे होते. मन्सुरीसोबत आलेल्या महिलेने चकमा देण्यासाठी आपल्या ऐवजी मन्सुरीच्या आईचे आधारकार्ड दिले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता मन्सुरी सोबत आलेली महिला ही बुरख्यात होती. त्यामुळे या महिलेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. दिंडोशी पोलिसांनी मन्सुरी याच्या मोबाईलचा सीडीआर, सीसीटीव्ही चित्रण आदींच्या आधारे तपास करून शोध घेण्यास सुरवात केली. तपास करत पोलीस राजस्थानमधील जयपूर येथे पोहोचले आणि बरकत राठोड या महिलेला ताब्यात घेतले.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरकत राठोड या महिलेचे मन्सुरी (४७) याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. दोन वर्षांपूर्वी बरकतच्या पतीला या दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे तिच्या पतीने तिला सोडून दिले होते. परंतु बरकत आणि मन्सुरी यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि तिने मन्सुरीचा काटा काढण्याचे ठरवले.
ती शनिवारी रात्री राजस्थानवरून मन्सुरीला भेटायला मुंबईत आली. शनिवारची रात्र दोघांनी मालाडच्या शालीमार हॉटेलमध्ये काढली. रविवारी तिने मन्सुरीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर मन्सुरीच्याच मोबाईल मधून त्याच्या पत्नीला मेसेज पाठवून आत्महत्या करत असल्याचे भासवले. मात्र तिने मेसेज इंग्रजीतून पाठवल्यामुळे पोलिसांना सशंय आला आणि बरकत पोलिसांच्या रडारवर आली. तिने हत्या का केली याचा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटवार आणि त्यांच्या पथकाने या हत्येचा छडा लावला.
What's Your Reaction?






