ऑनलाइन शिधापत्रिका संकेतस्थळाची धीम्या गती; नागरिकांची परवड कायम

ऑनलाइन शिधापत्रिका संकेतस्थळाची धीम्या गती; नागरिकांची परवड कायम

वसई  : शिधापत्रिका मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) संकेतस्थळाची गती अलीकडे धीम्या झाल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. वसई-विरार परिसरात शिधापत्रिका संबंधित तब्बल ३०० पेक्षा अधिक प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.

शिधापत्रिका काढणे, नावे जोडणे, कमी करणे, विभक्त करणे या कामांसाठी नागरिक दररोज सेतू कार्यालयात गर्दी करत आहेत. मात्र ऑनलाइन पोर्टल अत्यंत धीम्या गतीने कार्यरत असल्याने अर्जांची प्रक्रिया रखडत आहे. परिणामी नागरिकांना वेळेवर शिधापत्रिका मिळत नाही आणि त्यांची परवड होते आहे.ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या नागरिकांना दलालांकडून मार्गदर्शन घेताना आर्थिक लुटीस सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन पारदर्शकता आणि दलालप्रवृत्ती रोखण्यासाठी RCMS प्रणाली सुरू करण्यात आली होती.

पुरवठा विभागाने सांगितले की, RCMS संकेतस्थळावर दिवसभर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात काम सुरू असते, त्यामुळे गती कमी होते आणि कागदपत्रे अपलोड होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक वेळा अधिकारी रात्री बसून काम पूर्ण करत आहेत.

वसईच्या पुरवठा विभागात दररोज सुमारे ५० पेक्षा अधिक अर्ज येतात. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते वेळेत पूर्ण होत नाहीत. नागरिक वारंवार कार्यालयात भेट देऊनही काम न झाल्याने रिकाम्या हाताने परत जातात. त्यामुळे वेळ आणि पैशाचीही नासाडी होत आहे.

नुकतीच वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी याबाबत विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी ऑनलाइन अडचणी समजून घेत अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. यासोबतच पावसाळ्यातील धान्य साठा आणि वितरण सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले.

"RCMS संकेतस्थळाची गती कमी असल्याने काम रखडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी याबाबत माहिती दिली आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यास नागरिकांना जलदगतीने सेवा देता येईल."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow