ऑनलाईन जुगाराच्या कर्जबाजारीतून गुजराथच्या तरुणाची आत्महत्या; विरारच्या वैतरणा खाडीतून मृतदेह आढळला

वसई: ऑनलाईन जुगारात झालेल्या कर्जबाजारीमुळे गुजराथच्या वापी जिल्ह्यात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी मारून आत्महत्या केली आहे. अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव सपन पटेल (२७) असे असून, तो गुजराथच्या वापी येथे राहात होता. २ सप्टेंबर रोजी तो दुचाकीने मुंबईत नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो घरी परतला नाही. काही दिवसांनंतर त्याच्या कुटुंबियांना त्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत सपनने ऑनलाईन जुगारामुळे १५ लाख रुपयांचे कर्ज झाल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. या घटनेनंतर कुटुंबियांना धक्का बसला आणि त्यांनी वापी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
१२ सप्टेंबर रोजी विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. तपासानंतर हा मृतदेह सपन पटेलचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याची दुचाकी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली होती. सपनने वैतरणा खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचे आणि त्याचा मृतदेह वाहून अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर आल्याचे अर्नाळा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिंगारे यांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेने ऑनलाईन जुगाराच्या वाढत्या समस्येकडे समाजाचे लक्ष वेधले आहे.
What's Your Reaction?






