कुर्ला (प.) येथील भाभा रुग्णालयातील लिफ्ट महिन्याभराने पुन्हा सुरु – डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा

कुर्ला, ११ जून: कुर्ला (पश्चिम) येथील भाभा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील डायलिसिस विभागाकडे नेणारी लिफ्ट अखेर महिन्याभरानंतर पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे. या लिफ्टमुळे वृद्ध, गंभीर रुग्ण व व्हीलचेअर वापरणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिनाभरात लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना पायऱ्या चढाव्या लागत होत्या किंवा त्यांना उचलून न्यायचे भाग पडत होते. यामुळे अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांच्याकडे धाव घेतली. गलगली यांनी तत्काळ अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली. याची दखल घेत डॉ. शर्मा यांनी संबंधित विभागाला त्वरीत कारवाईचे आदेश दिले.
केवळ तीन दिवसांत लिफ्ट दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आली. ही तत्काळ कार्यवाही नागरिकांनी आणि रुग्णांनी स्वागतार्ह ठरवली असून, महापालिकेच्या उत्तरदायी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?






