रत्नागिरी, १९ जून: कोकण रेल्वेने कोकणातील चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेने २३ जूनपासून गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी होणार असल्याने, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ही विशेष योजना करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांप्रमाणे, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. विशेषतः गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी म्हणजे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी जास्तीत जास्त प्रवासी कोकणात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दिवशीच्या गाड्यांना विशेष मागणी असते.

कोकण रेल्वेने यंदाही या काळात २५० पेक्षा अधिक गणपती विशेष गाड्या सोडण्याची तयारी केली आहे. पावसाळी वेळापत्रकात आवश्यक ते बदल करून ही वाहतूक सुलभ होईल, याची काळजी घेतली जात आहे. रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे की, कोकणात प्रवास करण्यासाठी इच्छुक प्रवाशांनी ६० दिवस आधी आरक्षण करावे, म्हणजेच २३ जूनपासून आरक्षण सुरू होईल.

मुंबई-गोवा महामार्गाची कामे अद्यापही प्रलंबित असल्याने आणि वाहतूक स्थिती नाजूक असल्यामुळे अनेक चाकरमानी रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता असल्याने कोकण रेल्वेने वेळेत तयारी सुरू केली आहे.

प्रवाशांनी अधिकृत वेबसाइट आणि स्थानकांवरून वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.