गणेशोत्सवपूर्वी रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा सार्वजनिक बांधकाम विभागाला ठणकाव

पालघर : पालघर जिल्ह्यातील धोकादायक खड्डे, अपूर्ण रस्ते कामे, आणि असुरक्षित पूल यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. गणेशोत्सव सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना रस्त्यांची ही दयनीय अवस्था कायम राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची भेट घेऊन रस्त्यांच्या दुरवस्थेची माहिती देत निवेदन सादर केले. पालघर जिल्हा तयार होऊन जवळपास एक दशक उलटून गेले तरीही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अद्याप झाला नाही, अशी टीका या वेळी करण्यात आली.
बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवे, वधन पोर्ट, मुर्बे जेट्टी, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि रिलायन्स टेक्सटाईल पार्कसारख्या अनेक विकास प्रकल्पांचे कामे सुरू असताना देखील पालघरमधील मूलभूत रस्ते सुविधा अजूनही दुरवस्थेत आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून, जिल्हा प्रमुख अजय ठाकूर आणि अनुप पाटील यांनी “गणेशोत्सवपूर्वी खड्डे बुजवले गेले नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल,” असा इशारा दिला आहे.
विशेषतः उधवा-धुंदलवाडी मार्ग, चिंचणी परिसरातील रस्त्यांची अवस्था, सफाळे-वरई रोडवरील खड्डे आणि पारगाव पुलाची धोकादायक स्थिती यावर चर्चा झाली. तसेच, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सिमेंट काँक्रीटीकरण थांबविल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, प्रवाशांना मुंबई गाठायला ४ ते ५ तास लागतात. त्यामुळे अपघात व मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
या प्रकरणात केंद्र मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू ठेवण्याची आणि मार्ग पुन्हा डांबरीकरण करण्याची विनंती करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






