विरार : आपल्या वसईतील  नामवंत पतसंस्था जीवन विकास नागरी सहकारी पतसंस्थाला बँको या संस्थेतर्फे ब्ल्यू रिबन 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  350 ते 400 कोटी ठेवी असलेल्या पतसंस्थेच्या वर्गवारीत  गुणवत्तापूर्वक काम केल्याबद्दल हा पुरस्कार जीविका पतसंस्थेला प्राप्त झाला आहे.  या विभागात पुरस्कार प्राप्त करणारी कोकण विभागातील  जीवन विकास नागरी सहकारी ही एकमेव पतसंस्था आहे.  महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कारामुळे जीविका पतसंस्थेच्या वाटचालीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  अँम्बे व्हॅली, लोणावळा येथे ‘बँको ब्लू रीबन २०२४’ या कार्यक्रमात  अध्यक्ष श्री. नेल्सन दोडती, उपाध्यक्ष श्री. संज्याव रोझारिओ, संचालक श्री. आल्बर्ट परेरा, संचालक श्री. जीवन चौधरी व तज्ञ संचालक श्री. मँथ्यू डिसोझा यांनी हा पुरस्कार पतसंस्थेच्या वतीने  स्विकारला.

जीविका  पतसंस्थेची सभासद संख्या 18,000 हून अधिक असून मिश्र व्यवसाय 600 कोटीवर गेला आहे. पतसंस्थेच्या सहा शाखा असून कोअर बँकींग द्वारे सक्षम सेवा पतसंस्था देत आहे. लवकरच सभासदांसाठी ऑनलाइन बँकींग सुरु करण्यात येणार आहे. पतसंस्था जीवन विकास मंडळ या  पितृसंस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय-शैक्षणिक निधीद्वारे गरजू व्यक्तिसाठी लाखो रुपयांचे आर्थिक सहाय्य करत असते.
पतसंस्थेला मिळालेला पुरस्कार हा संस्थेच्या सभासदांनी संस्थेवर टाकलेला विश्वास, सर्व आजी-माजी संचालक व कर्मचाऱ्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. नेल्सन दोडती यांनी दिली.