ठाणे : नाल्यावर सुरू असलेल्या कामामुळे पाणी तुंबले; सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा, रहिवाशांचे हाल

ठाणे:ठाणे शहरातील के-व्हीला परिसरात बुधवारी अवकाळी पावसामुळे नाल्यात पाणी तुंबून ते आसपासच्या सोसायट्यांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. नाल्याच्या रुंदीकरणानंतरही त्यावर स्लॅब टाकून रस्ता तयार करण्याचे काम सुरू असल्याने नाल्यात कचरा अडकल्यामुळे पाणी साचले आणि परिसरातील भगीरथ जगन्नाथ, सामंत वाडी, इंदिरा कॉलनी यांसारख्या भागांतील अनेक इमारतींच्या आवारात सांडपाणी घुसले.
या कामासाठी नाल्यामध्ये बांबू लावण्यात आले असून, यामुळे कचरा अडून पाणी नाल्यात साचले. पाण्याचा निचरा होऊ न शकल्याने काही मिनिटांतच रस्ते जलमय झाले आणि नागरिकांची ये-जा पूर्णतः विस्कळीत झाली. या भागात पूर्वीही पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तक्रारी होत्या, म्हणूनच पालिकेने नाला रुंद केला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या स्लॅब टाकण्याच्या कामामुळे परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे.
ठाणे कारागृहालगत असलेल्या या नाल्यावर सुमारे ६७६ मीटर लांबीचा स्लॅब टाकून के-व्हीला ते पंचगंगा दरम्यान रस्ता तयार केला जात आहे. यामुळे कळवा-साकेतकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असला तरी, कामाच्या अनियमिततेमुळे नाल्यातून येणाऱ्या डोंगरातील कचऱ्यामुळे जलप्रवाह थांबतो आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी साचते.
रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साचलेले पाणी व कचरा हटवण्याचे काम तातडीने सुरू केले. नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाल्यातील अडथळे दूर करण्यात आले असून २० मेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी या परिस्थितीबद्दल रोष व्यक्त करत पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे त्वरित पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
What's Your Reaction?






