ठाण्यात १२ टनाहून अधिक निर्माल्य झाले जमा

ठाणे:ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या.
या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
*१२ टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी केले दान*
ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे.
*विसर्जनाची आकडेवारी*
*(विर्सजन स्थळ (संख्या) - गणेश मूर्तीची संख्या)*
कृत्रिम तलाव (१५) - ८७००
खाडी विसर्जन घाट (०९) - ६५२०
विशेष टाकी व्यवस्था (४९) - १६२१
फिरती विसर्जन व्यवस्था (०६) - २७
मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) - २४५
*एकूण - १७११३*
*फिरती विसर्जन व्यवस्था*
यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, 'पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४' या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे.
*टाकी व्यवस्था ४९ ठिकाणी*
गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली आहे.
*१० मूर्ती स्वीकृती केंद्रे*
तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.
*१५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था*
आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
*०९ ठिकाणी विसर्जन घाट*
त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.
What's Your Reaction?






