ड्रोनवर बंदी : वसई-भाईंदरमध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई

वसई, २१ मे: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ३ जून २०२५ पर्यंत ड्रोन व अन्य मानवरहित हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी हे आदेश जारी केले असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. देशाच्या सीमांवरील तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता, असामाजिक घटकांकडून ड्रोनचा दुरुपयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी म्हणून या बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या बंदी कालावधीत कोणताही नागरिक, संस्था किंवा व्यावसायिक व्यक्ती ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र उडवू शकणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व अन्य लागू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसर, महत्त्वाची शासकीय इमारती, वर्दळीची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी या बंदीचा अधिक प्रभावी अंमल केला जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोणतीही शंका असल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






