तुंगारेश्वर अभयारण्यात धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी
दुर्घटनांच्या वाढत्या घटनांमुळे वनविभागाची कारवाई

वसई, ३० जून — पावसाळ्यात धबधब्यांवर पर्यटकांची वाढती गर्दी व त्यातून होणाऱ्या दुर्घटनांचा विचार करता, वसई (पूर्व) येथील श्री तुंगारेश्वर अभयारण्यात असलेल्या धबधब्यांवर व नाल्यांवर वनविभागाने पर्यटकांसाठी तात्पुरता प्रवेशबंदी आदेश लागू केला आहे. वनविभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम, 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
वसई तालुका हा निसर्गरम्य परिसर असून समुद्रकिनारे, ओढे-नाले आणि धबधब्यांनी समृद्ध आहे. श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर असलेल्या या अभयारण्य क्षेत्राला महाराष्ट्र शासनाने 2000 साली 'क' वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे वर्षभर भाविक आणि पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः पावसाळ्यात धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि थंडगार पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
मात्र काही अतिहौशी पर्यटक सेल्फी काढणे, उंच ठिकाणांवरून उड्या मारणे, पाण्यात पोहणे यासारख्या धोकादायक प्रकार करताना दिसून येतात. अशा घटनांमुळे दरवर्षी अपघात होऊन काही जण जखमी किंवा बुडून मृत्युमुखी पडतात.
यंदा अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने आधीच पावसाळ्याच्या सुरुवातीला दक्षता घेत प्रवेशबंदी लागू केली आहे. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी आणि विनाकारण धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
What's Your Reaction?






