मीरा-भाईंदर :दहिसर टोल नाका टोलमुक्त झाल्यानंतरही येथे वाहतूक कोंडी कायम असल्याने नागरिकांना तासनतास खोळंबा सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल नाक्याला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि ठेकेदारावर संताप व्यक्त केला.

मंत्र्यांनी ठेकेदारांना इशारा देत म्हटले की, "लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर सरकार आक्रमक पवित्रा घेईल."

मीरा-भाईंदर शहरातील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मेट्रो मार्गालगत तीन उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील एक पूल गेल्या वर्षीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. उर्वरित दोन पुलांपैकी दुसरा पूल येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत आणि तिसरा पूल ऑगस्टच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाने कामाच्या गतीत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या काही महिन्यांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यास दहिसर टोल नाक्याजवळील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.