नालासोपारा : दुचाकीस्वाराच्या गळ्यातील साखळी आणि मोबाईलची जबरी चोरी, ₹1.5 लाखांचा ऐवज लंपास

नालासोपारा : दुचाकीस्वाराच्या गळ्यातील साखळी आणि मोबाईलची जबरी चोरी, ₹1.5 लाखांचा ऐवज लंपास

वसई-विरार : नालासोपारा पूर्वेकडील कमान-नायगाव रस्त्यावरील ममता सर्कलजवळ एका दुचाकीस्वाराची जबरदस्तीने सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन्स असा अंदाजे ₹1.5 लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओळख पटलेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

या प्रकरणी दीपेश धीरज चव्हाण (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. ते नालासोपारा पूर्वेतील संयुक्त नगर येथे राहतात आणि खासगी नोकरी करतात. त्यांनी पोलीस तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ते कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले होते. ममता सर्कलजवळील भजनलाल डेअरी परिसरात अचानक एक इसम त्यांच्या गाडीपुढे आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, कानातील सोन्याचे झुबे आणि मोबाईल फोन्स जबरदस्तीने हिसकावून घेतले.

या चोरीत दोन मोबाईल फोन्स (प्रत्येकी किंमत ₹१०,०००), सोन्याचे झुबे (₹४०,०१४) आणि सोन्याची साखळी (₹८९,१८१) असा एकूण ₹१,४९,१९५ किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. चोरट्याची ओळख ‘संदेश टोपरे’ अशी झाली असून, तो सध्या फरार आहे.

या प्रकरणी ३ ऑगस्ट २०२५ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. चोरी गेलेल्या वस्तूंचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

ही घटना भरदिवसा आणि गर्दीच्या भागात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow