नालासोपारा : नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं आपल्या पतीचा खून करून त्याला घराच्या जमिनीखाली पुरल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात तिला तिच्या प्रियकराची मदत असल्याचं समोर आलं आहे. आरोपी पत्नी व तिचा प्रियकर सध्या फरार असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
ही घटना नालासोपारा पूर्वेतील गंगाडिपाडा भागातील साई वेल्फेअर सोसायटीमध्ये घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे १५ दिवसांपूर्वी या महिलेनं आपल्या पतीचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह घरातील खोलीच्या जमिनीखाली पुरण्यात आला. या कृत्याचा माग काढता यावा म्हणून, तिनं आपल्या नवऱ्याच्या भावाकडूनच त्या जमिनीवर टाइल्स बसवून घेतल्या. त्याला या घटनेबाबत काहीच माहिती नव्हती.
दोन दिवसांपूर्वी पतीच्या अचानक बेपत्ता होण्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पेल्हार पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह पाहणी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झालं असून, पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
आरोपी पत्नी व तिचा प्रियकर सध्या फरार आहेत. पोलिसांनी या दोघांनाही शोधण्यासाठी विशेष पथक तयार केलं असून, नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Previous
Article