मीरा रोडच्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार — आरोपी हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक

मीरा रोडच्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार — आरोपी हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक

भाईंदर: लंडनमधील एका विमान कंपनीतील २५ वर्षीय कर्मचाऱ्याने मीरा रोड येथील एका २३ वर्षीय एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी सहार विमानतळ पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. आरोपी हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत होता.

पीडित महिला लंडनच्या विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत आहे. २९ जून रोजी ती कामानिमित्त लंडनला गेली असता, विमानात तिची आरोपीशी ओळख झाली. दोघेही लंडनमधून परतल्यावर आरोपीने तिला एका पार्टीला नेले आणि जबरदस्तीने मद्यपान करायला लावले. नशेत असताना त्याने तिला खाजगी टॅक्सीतून पहाटे २.४५ वाजता मीरा रोड येथील आपल्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नशेत असल्याने मी प्रतिकार करू शकले नाही, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपीने दिली.

पीडित महिला परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार), ३५१(१), आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवला. आरोपीने भारतातून कायमचा निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हाँगकाँगमध्ये दुसऱ्या विमान कंपनीत नोकरी मिळाली होती आणि व्हिसाही मिळवले होते.

नवघर पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दक्षता विभाग आणि सहार पोलिसांच्या मदतीने आरोपीला विमानतळावरूनच अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow