निवडणुकीचे संकेत मिळताच राजकीय हालचालींना वेग; वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

वसई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, तब्बल पाच वर्षांनंतर वसई-विरार महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांचे दालन खुले झाले आहे. निवडणुकीच्या संभाव्यतेचे संकेत मिळताच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले की, “निवडणुका व्हाव्यात यासाठी आम्ही न्यायालयात पाठपुरावा करत होतो. ही आमचीच प्राथमिक मागणी होती. आमचा वर्षभरचा विश्वास आमचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर आहे.”
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी म्हटले, “पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत आमच्याकडे अनुभवी व इच्छुक उमेदवार आहेत. निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे नगरसेवकांचा एक कार्यकाल वाया गेला, ही बाब गंभीर आहे.”
दरम्यान, काँग्रेसचे नेते अॅड. जिमी गोन्साल्वीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “निवडणुका न झाल्यामुळे शासनाचा मनमानीपणा वाढला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय याआधीच द्यायला हवा होता.” त्यांनी हेही स्पष्ट केले की यामुळे वसई तालुक्यातील २९ गावांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचेही मार्ग मोकळे झाले आहेत.
युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुदिप वर्तक म्हणाले, “बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी आमचे चर्चा सुरू आहेत. लवकरच निवडणुकीतील आमची भूमिका स्पष्ट केली जाईल.”
भाजपही या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांनी म्हटले, “विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने वसई-विरार परिसरात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आहोत.”
२०१४ साली पार पडलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०५ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. शिवसेनेला ५, आपला पक्षाला ४ आणि भाजपला केवळ १ जागा मिळाली होती. करोना महामारीनंतर महापालिका निवडणुका झाल्या नसल्याने सध्या पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे.
राजकीय हालचालींनी वेग घेतल्याने वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता असून येणाऱ्या दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येईल.
What's Your Reaction?






