वसई: विरारमधील एका मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी कमलेश कदम (४५) याला विरार पोलिसांनी गुजराथमधील सुरत येथून अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता, आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

आरोपी कमलेश कदम हा विरारमध्ये राहत आहे. त्याचा मित्र तुरुंगात असल्याने त्याने त्याच्या पत्नी आणि मुलीला सांभाळण्याची विनंती केली होती. मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच राहू लागली. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, आरोपीने तिच्या दोन मैत्रीणींनाही त्याच्या हेरफेरांचे शिकार बनवले. या दोन्ही मुली १३ वर्षांच्या आहेत.

मागील दिड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सोमवारी १३ वर्षांच्या मुलीने विरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, आणि पोलिसांनी आरोपी कमलेश कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र तो फरार होता. विरार पोलिसांच्या पथकाने आरोपीला गुजराथमधील सुरत येथून अटक केली.

विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी सांगितले की, "आरोपीने तिन्ही मुलींच्या अज्ञानाचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे. आम्ही इतर मुलींवरही आरोपीने असे कृत्य केले आहे का याची चौकशी करत आहोत."

पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.