भाईंदर - भाईंदरच्या आर.एन.पी. पार्क येथे राहणाऱ्या गणेश हंचाटे यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सोनाली राऊत आणि तिचे पती शब्बीर शेख यांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गणेश हंचाटे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ ऑक्टोबर रोजी त्यांनी मनपामध्ये सोनाली राऊत आणि शब्बीर शेख यांच्या विरोधात सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गणेश हंचाटे यांना पाकिस्तानच्या नंबरवरून धमकीचे फोन येऊ लागले आहेत.

गणेश हंचाटे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे शेजारी सोनाली राऊत आणि तिचा पती शब्बीर शेख यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले आहे. त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी मनपामध्ये या अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर, १५ ऑक्टोबरला गणेश हंचाटे यांना पाकिस्तानच्या मोबाइल नंबरवरून धमकीचे फोन आले होते. 

तसेच गणेश हंचाटे यांनी सोनाली यांच्या भारतीय नागरिकत्वावरही संशय व्यक्त केला आहे, "सोनाली या बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक असू शकतात. तसेच मराठी नाव वापरून त्या भारतात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत". असा आरोप गणेश यांनी केला आहे. 

पाकिस्तानातून आलेल्या धमकीच्या कॉल्सच्या स्तोत्राचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांनी त्वरित तपासला सुरुवात केली असल्याची माहिती नवघर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक धीरज कोली यांनी दिली. तसेच मात्र, त्यांनी तपासाबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला तसेच त्यांनी माध्यमांसमोर काहीही बोलण्याचे टाळले.